Pages

Wednesday, 26 October 2011

चारोळ्या


नजर  मिळाली नजरेला तर ,
वादळाची भीती आहे.
नजर मिळाली न  जर  तर ,
सर्वच कसं शांत आहे .
                                           वेडी वाकडी असली तरी,
                                           वाटेवर माझे प्रेम आहे ,
                                           तुझ्यापर्यंत घेऊन जाते ती ,
                                           तसं तिचंही माझ्यावर प्रेम आहे .


  तुझ्या माझ्या स्नेहफुलांचा 
  गंध काही आगळा आहे ,
  सुकत सुकत गेली  तरी ,
   सुगंध त्यांचा  वेगळा आहे .

                                          निखळत्या ताऱ्याकडे  पाहून ,
                                           तू यावस हि इच्छा केली,
                                           डोळे वाटेकडे लावून बसले ,
                                           तेवढ्यात मांजर आडवी गेली.

 जगाला कशाला हसायचं,
 असतील शीत तर नाचतील भूत म्हणून ,
 भर दुपारी स्वतः चीचं पहा ,
 सावली सुद्धा राहते लपून .

                                           सुख सुख काय घेऊन बसलात, 
                                           सम दुःखाची बोला भाषा ,
                                           मिळतील घायाळ हृदयानाही,
                                            नवजीवनाच्या नवीन आशा .....!

मना मनाची भाषा कसली,
इथे हृदयही विकत मिळतात,
वेळप्रसंगी पाहिजे असल्यास,
भाड्यानेही अश्रू मिळतात .





Protected by Copyscape Web Copyright Checker














Monday, 15 August 2011

येथे कर माझे जुळती !

      कणाकणात  भरलेला परमेश्वर  अनेक रूपांनी  आपल्याला  दर्शन  देत  असतो  .मनुष्य  ही त्याची    सर्वश्रेष्ठ  कलाकृती   आहे  .या कलाकृतीतून  तो  कधी  कधी  आपले  रूप  प्रकट  करतो .
  
     कै. तीर्थरूप मेजर नारायणराव .भ.खानविलकर (माझे सासरे ) यांच्या बाबतीत  हे  पुरेपूर पटते .दि .१९ जानेवारी   २००७  रोजी  वयाच्या  ८६  व्या  वर्षी  त्यांनी स्वर्गलोकाचे   आमंत्रण आले  .
     
       द्वेषभावनेपासून  रहित , प्राणीमात्रांशी  जो  मित्रतेचा  भाव  राखतो , दया आणि करुणेने ज्याचे हृदय ओतप्रोत भरलेले आहे, ज्याच्या अंगी  मी आणि माझे  हा  अहंकार  नाही, पक्ष -विपक्ष  न  मानणारा , क्षमाशील  जो  सतत  संतुष्ट  आहे ,ज्याची  भक्ती  आणि संकल्प  दृढ  आहे  , ज्याने  आपले  मन  व  बुद्धी  ईश्वराच्या  चरणी  अर्पित  केली आहे  असा  भक्त  मला  अतिशय  प्रिय  आहे .  भगवान  श्री  कृष्णाने  गीतेमध्ये  केलेले  हे  कथन , ति.  पप्पांच्या  (कै .मेजर  नारायणराव  खानविलकर ) जीवनाशी  तंतोतंत  जुळते .परमेश्वरावर असलेली अतूट श्रद्धा आणि गाठीशी असलेली अमाप पुण्याई त्यांना अनेक युद्धातून सुखरूप परत घेऊन आली.
                               
       १९५६ सालापासून तिबेट , नेफा  आणि नागालंड या सरहद्दीवरच्या  उमेदीची अनेक वर्ष त्यांनी देशसेवेसाठी अर्पण केली .१९५९ साली त्यावेळच्या नेफाच्या गव्हर्नरकढून  त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसापत्र मिळाले.
१९६२ सालातील भारत-चीन युद्धात त्यांचा सक्रीय सहभाग होता.१९६५ साली भारत-पाक युद्धात त्यांचा ६-कुमाओ रेजिमेंटने  इछोगील कॅनल क्रोस केला आणि यशस्वीरीत्या  लाहोर कढे कूच  केला.
१९७१  साली बांगला युद्धातही  ते  सहभागी  होते  .हिमालयाची उत्तुंग शिखरे त्यांच्या या सर्व पराक्रमांची साक्ष देतात .    
     उन-पाऊस , कडे कापऱ्या , भूक -तहान , काटेकुटे कशा कशाचीही पर्वा त्यांनी केली नाही.देशसेवा हेच एक व्रत .....मनात एकाच घोष..
                 अपनी आजादी को हम हरगीज मिटा सकते  नही,
                 सर  कटा सकते  है लेकीन  सर  झुका  सकते  नही.

        अत्यंत  रुबाबदार  असे  व्यक्तिमत्व  त्यांना लाभले  होते .उमदा  स्वभाव  , कमालीची  विनम्रता , तसीच  वाखाणण्यासारखी   परोपकारी वृत्ती  असल्यामुळे  'हे  विश्वची माझे  घर  '  हीच  त्यांची  स्वतःच्या  घराची  संकल्पना  होती.
 गरजू विद्यार्थ्यांना योग्य  शिक्षण मिळावे म्हणून ते सतत प्रयत्नशील असत .याचे उत्तम उदाहरण म्हणजे
स्वतःच्या मुलाला (श्री विभाकर) मिळालेली राष्ट्रीय शिष्यवृत्ती त्यांनी घेऊ नको म्हणून सांगितले . त्या मागची उद्दात भावना अशी कि , ते म्हणत" तुझी शैक्षणिक फी भरण्यास मी समर्थ आहे , ह्या शिष्यवृत्तीची 
खरी गरज एखाद्या गरीब होतकरू  विद्यार्थ्याला असेल तर त्याला ती मिळू दे ".
               आपल्या पुरुषार्थावरचा  असा ठाम विश्वास , तसेच निःस्वार्थ वृत्ती क्वचितच पहावयास मिळते .
सीमेवर असतानाही आपल्या कुटुंबियांच्या भवितव्याकडे   त्यांनी कधीच दुर्लक्ष केला नाही .हृदयात खोलवर 
रुजलेली राष्ट्रनिष्ठा व शिक्षणावरील आत्यंतिक प्रेम त्यांच्या अनेक पत्रातून दिसून येते.
              "जय जवान जय किसान " हा जयघोष त्यांनी मनोमन जपला .निवृत्तीनंतर शहरात मिळू शकणाऱ्या
अनेक सुख-सोयींना झुगारून देऊन त्यांनी आपल्या लाडक्या बेनी गावी राहण्याचा निश्चय केला. गावी जाऊन 
त्यांनी स्वतः शेती बागायतीवर मेहनत घेतली. युद्धात शत्रूला खडे चारणारे "जय जवान" आता  "जय किसान" झाले .रायफल ठेवल्यावर , नांगर उचलून त्यांनी आपला खांदा सजवला .
             " हाताने काम , मुखाने नाम व अन्तः करणात राम " हे त्यांचे जीवनमूल्य होते. रत्नागिरीच्या सोल्जर बोर्डात सेक्रेटरी म्हणून कार्यरत असतांना त्यांनी अनेक सैनिक कुटुंबाना त्यांची हक्काची पेन्शन मिळवून दिली. या कामासाठी ते खूप कष्ट घेत असत. तहानभूक विसरून , खेड्यापाड्यात पायी चालून ते हे काम करीत असत . ह्या मोबदल्यात आपल्याला मान-सम्मान मिळावा अशी त्यांनी कधीच अपेक्षा केली नाही. किंबुहाना हा मिळू शकणारा सम्मान त्यांनी फाइल मध्ये बंधिस्त करून टाकला .
                 देशसेवा हेच त्यांचा व्रत व ध्येय असल्यामुळे अतिरिक्त , अर्थार्जनाची हाव त्यांनी केली नाही. त्यांच्या "मेजर"  या पदवीत ते खुशाल होते .
            देशसेवेच्या व्रतातून त्यांनी शारीरिक निवृत्ती घेतली पण मनाने ते अखेर पर्यंत "वीर जवान" च होते .
            पहाटे चार वाजता उठून ते समर्थांच्या दासबोधाचे पारायण करत असत . त्यानंतर १-२ तास देव पूजा ,
प्रार्थना होत असे. नंतर मोठ्या अभिमानाने ते उभे राहून " जन-गण-मन" हे राष्ट्रगीत म्हणत असत. शेवटी 
"भारतमाता कि जय " या जयघोषाने पूजा समाप्त होत असे. २६ जानेवारी  व १५ ऑगस्ट या दोन्ही दिवशी 
झेंडावंदनासाठी ते आवर्जून नजीकच्या ऑफिस मध्ये हजर असत . जो पर्यंत तब्बेत साथ देत होती .....हे दोन्ही 
राष्ट्रसण त्यांनी आनंदाने साजरे केले . या दिवशी दूरदर्शनवर असणारे राष्ट्रपतींचे भाषणही मन लावुन,अभिमानाने ऐकत असत . हे जीवन क्षणभंगुर आहे , इथे जगायला मिळणारा प्रत्येक क्षण किती मोलाचा आहे , तो कसा सत्कारणी लावावा हे त्यांच्या जीवन पटावरून शिकावे.
        त्यांचा करारी स्वभाव व कडक शिस्त  या बद्दलची अनेक मते ऐकू येतात कधी कधी ! परंतु मला वाटतं की, "टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही " यावर त्यांचा विश्वास होता .
     आपल्या जीवनातील सुख-दुःखाचे प्रसंग व त्यापासून मिळालेली शिकवण , आम्हाला ते समजावून सांगत असत.अशारितीने त्यांनी आमच्या मनाच्या मातीला अनुभवाच्या चाकावर फिरवून सुंदर घड्याचे रूप दिले .
त्या घड्यात सुविचाररुपी हिरे , माणिक , मोती भरून ठेवायची जबाबदारी आमची आहे . याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. 
    त्यांचं खंबीर अस्तित्व आमच्यासाठी एक अभेद्य तटबंदी होती . त्यांच्या पवित्र हृदयमान्दिरातून निघालेल्या शब्दांचा घंटानाद आम्हा सर्व लेकरांच्या मनात अखंड घुमत राहील एवढी ताकद त्या शब्दांत आहे.
   अथक परिश्रम अतिसंवेदनक्षम मन आणि वृद्धत्वाकडे  झुकलेलं शरीर यामुळे हळूहळू यांचा स्मृतिभ्रंश  होऊ 
लागला .अल्झेमर हा पूर्ण बरा न होणारा आजार त्यांना जडला .गतस्मृतीत कधी कधी ते दंग होत व म्हणत ,
"मला फ्रंटवर बोलावलं आहे मला लगेचच निघावं लागेल , सामान वगैरे बांधून तयार आहे , गाडीचीच  वाट
बघतोय ...."
नसनसात भिनलेली पारदर्शी राष्ट्र भक्तीच असा बोलू शकते .
   जीवनाच्या अखेरीस " ओम नमः शिवाय " हा मंत्र ते सतत जपत राहिले . आशीर्वाद देणारे दोन्ही हात फक्त 
महादेवासाठी जोडले गेले .
    अखेरचा काही काळ फक्त प्रशांत......निःशब्द ......अवस्था होती. उरलं होतं फक्त अंतिम समर्पण .
परम कर्तव्यासाठी , देव आणि देशभक्तीसाठी  , या परमवीराने १९ जानेवारी २००७ रोजी आपली इहलोकीची यात्रा संपवली , अखेरचा संदेश देत ......

                                  सांस थमती गयी, नब्ज जमती गयी 
                                           फिर भी बढते कदम को न रुकने दिया 
                                   कट गये सर हमारे , तो कुछ  गम नही
                                        सर हिमालय का हमने न झुकने दिया 
                                  मरते मरते रहा बाकपन साथीयो
                                        अब तुम्हारे हवाले वतन साथीयो ..........
                                  कर चले हम फिदा जानो तन साथीयो 
                                       अब तुम्हारे हवाले वतन साथीयो....!

भारतमातेच्या वीरजवानांना माझे शतशः  प्रणाम !
                                            

                                                 जय हिंद !





  






























































Protected by Copyscape Web Copyright Checker

Sunday, 19 June 2011

चारोळ्या


तुझ्या मध्ये मला मी, 
    खूप शोधून पाहिलं,
माझ्यामध्ये  तुला मात्र, 
   शोधावच नाही लागलं.




           
 तुझ्या आणि माझ्या मध्ये
     कधीच नव्हता दुरावा,
 मला हे माहित आहे,
     पण तूच मागशील पुरावा .



Saturday, 18 June 2011

Monday, 6 June 2011

किमया मोजक्या शब्दांची


        शब्दांमध्ये जादू  असते, असे विधान आपण वारंवार ऐकतो, अक्षर अक्षर जोडून तयार  झालेले हे शब्द     जेव्हा मोजकेच वापरले जातात , तेव्हा त्यांच्यात जादू भरली जाते. हे मोजके शब्द भाषेचे सौंदर्य वाढवतात.
       
     शब्दांचे भले मोठे बोचके घेऊन हिंडण्यापेक्षा  त्या ऐवजी मोजके शब्द वापरले तर सुटसुटीतपणा येतो . या मोजक्या शब्दाचा  उपयोग  कधी कधी रेशमी चिमटे काढण्यासाठी होतो , तर कधी एखाद्याची  कानउघडणी करण्यासाठीही होतो .
शहाण्याला शब्दांचा मार म्हणतात ते तेवढ्यासाठीच.हे मोजके शब्द जास्त बडबड न करता पाहिजे तो अचूक परिणाम साधून देतात.
        
        हे मोजके शब्द कधी गोड तरी कधी कडू .कधी पिढ्या पिढ्यांचे वैर मिटवू शकतात, तर कधी क्षणार्धात जन्मजन्मांतरीचे नाते तोडू शकतात.काही शब्द कडू औषधांप्रमाणे हितकारक असतात. तर खोट्या प्रशंसेचे गोड शब्द अहित करू शकतात.....कावळा आणि कोल्ह्याची गोष्ट सर्वश्रुतच आहे .
काही शब्द ओले असतात , भावनांच्या सरी ने भिजलेले ........!तर काही कोरडे असतात, मनात भावना नसली तरी वापरावे लागणारे ..! काही शब्द मुळमुळीत तर काही धारदार असतात.शब्दाने (कि अपशब्दाने) व्यक्त केलेला राग एखाद्यावर परिणाम करून जातोच ना?
         
        काही मोजके शब्द फसवे असतात . शहाणा या शब्दाचा अर्थ खरंतर बुद्धिमान , परंतु " ए शहण्या " असे जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्या मागे कुत्सित भावच असतो.
 हे मोजके शब्द प्रवासात पण आपले किती मनोरंजन करतात नाही का ? डोंगरावर , रस्त्यावरच्या    पाट्यांवर,तर कधी वाहनांवर लिहिलेली , " शिकेल  तो टिकेल " , वाचाल तर वाचाल ,तसेच  मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, नजर  ह्टी दुर्घटना घटी, किंवा  safety on road is safe tea at Home , अशी  सुंदर सूचक वाक्य  बेभान  माणसांना भानावर  आणतात  .

          एखाद्याने आपले काम केले कि आपण "Thank-you" , चूक केल्यास "sorry" म्हणतो   .हे शब्द हुकमी एक्क्याचे काम करतात .Good Morning,Good Night   हे मोजके शब्द सर्वांचेच लाडके आहेत .परंतु मराठी भाषा इतकी इंग्रजाळलेली आहे कि Good Afternoon ऐवजी " शुभ दुपार  "कोणी म्हटलं तर त्यावर  नसती  शंकाच  घेतली जाईल.
ह्या मोजक्या शब्दांची खरी कसरत न्यायालयात पाह्यला मिळते .एखादी केस चालू असताना दोन्ही पक्षाच्या वकिलांनी आपआपल्या अशिलाला शिकवून ठेवलेले  मोजके शब्द जर चुकीचे उच्चारले गेले तर "point to be noted" हे विरुद्ध पक्षाच्या वकिलाचे मोजके शब्द ऐकावे लागतात .संपूर्ण केस चा निकाल त्यावरच अवलंबून असतो, कारण न्यायदेवतेने  डोळ्यावर पट्टी बांधली आहे , कानावर नाही .
         
         सुबक मोजक्या शब्दांची खरी गरज जाहिरातीसाठी असते . "जोर का झटका धीरे से लगे" ," ढूंढते रह जाओगे" या सारख्या जाहिरातींचे शब्द जागो जागी वापरले जातात.
आपला लाडका  टीव्ही शो "कौन बनेगा करोडपती " मधील अमिताभ बच्चन(बिग बी ) च्या तोंडचे ," Sure ? confident ? Lock kar diya jaye ?" हे मोजके शब्द  "Big Hit" होऊन  गेले .
 मोजक्या शब्दांचा महत्वाचा उपयोग युद्ध क्षेत्रात होतो .तातडीचे संदेश मोजक्या सांकेतिक  शब्दात , मोजक्या वेळात  पोहचवणे , अत्यंत कौशल्याचे काम आहे ..
        
        "विचारपूर्वक बोललेले शब्द  शास्त्र  बनतात ,अविचाराने बोललेले शब्द शस्त्र बनतात", असे म्हटले जाते.
 शिकागो येथील धर्म परिषदेत भाषण करण्यास गेलेल्या स्वामी विवेकानंद ह्यांनी भाषणाची सुरुवातच  "My Brothers and Sisters of America" अश्या मोजक्या शब्दांनी केली, आणि ते शब्द श्रोत्यांच्या थेट हृदयाला जाऊन भिडले .
"हर हर महादेव" ह्या मोजक्या किमयागार शब्दांनी मराठ्यांचा इतिहास घडवला.
"वंदे मातरम " , " अंग्रेज भारत छोडो ", " करेंगे या मरेंगे "  ह्या मोजक्या शब्दांनी  स्वतंत्र भारत घडवला .
असे हे शब्द कधी शांती दूताचे  काम करतात ,कधी हुकुमशाह तर कधी प्रेमदूत बनतात.
 हे मोजके शब्द कधी कधी परिसाचे काम करतात .माता - पिता तसेच गुरूंच्या आशीर्वादाच्या  मोजक्या शब्दांचा परीस आपल्या  बुद्धीचे सोने करतो ." आयुष्यमान  भव " , "कीर्तिमान भव "  ,"यशस्वी भव" या सारख्या आशीर्वादाचे मोजके शब्द भारतीय संस्कृतीचे  मुकुटमणी आहेत .

         "ओम नमो भगवते वासुदेवाय " ! हे मोजके शब्द जेव्हा मंत्र रूपाने जपले गेले , तेव्हा बाल भक्त प्रल्हादासाठी प्रत्यक्ष परमेश्वराला अवतरावे लागले .
"राम" ह्या शब्दाचे सामर्थ्य इतके  , कि त्याच्या जपामुळे महा पापी वाल्याचे रुपांतर  .."वाल्मिकी" ऋषित झाले 
नुसत्या "ओम" च्या उच्चारणाने मानवाच्या जीवनात क्रांती घडू शकते . 


    असे हे जीवन घडवणारे मोजके शब्द कधी कधी  कळीच्या नारदाचे सुद्धा काम करून जीवन बिघडवू शकतात.
शब्दांना दोष देण्यात काय अर्थ आहे? मानवाच्या हातातील ते कठपुतलीच आहेत.पेशवेकालीन उदाहरणावरून हे तंतोतंत पटते.
पेशवे नारायणराव यांना   बंदिस्त  करून आपण पेशवा व्हावे  या इच्छेखातर  राघोबा दादांनी ,"नारायणरावाला धरावे " असे फर्मान काढले . परंतु त्यांची कारस्थानी पत्नी आनंदीबाई हिने   "ध" चा "मा" करून " नारायणरावाला मारावे " असे फर्मान पाठविले  .त्या  हुकुमानुसार   नारायणरावांची  हत्या  झाली  आणि  ह्या  मोजक्या  शब्दांनी  पेशवाई  हादरली  .
 तसेच पुराणातील उदाहरण घ्यावे , तर पांडव पत्नी द्रौपदीने ,दुर्योधनाला उद्देशून बोललेले " अन्धाचा पुत्र अंध " तसेच  सूर्यपुत्र कर्णाला "सूतपुत्र" म्हणून हिणावलेले शब्द ठिणगी बनले, आणि महाभारतात वणवा पेटवण्यास कारणीभूत ठरले .
संपूर्ण  रामायणात डोकावून पहिले तर लक्षात येईल कि राजा दशरथाने ,राणी कैकयीला  दिलेल्या  मोजक्या शब्दांचा वचनामुळे प्रभू रामचंद्रांना , किंबहुना सर्व अयोध्या वासियांना वनवास भोगावा लागला .कैकयीला दिलेल्या मोजक्या शब्दांचे वरदान जणू शापच ठरले .
वनवासात असताना लक्ष्मणाने सीतेच्या संरक्षणार्थ पर्णकुटीभोवती मंत्रोच्चाराने रेष मारली .ती रेष जो कोणी ओलांडेल तो भस्म होईल एवढी तीव्र शक्ती तिच्यात होती. सर्व मायावी विद्यांमध्ये  पारंगत लंकाधिपती रावणही ती लक्ष्मणरेषा ओलांडू शकत नव्हता , असे असतात हे मोजके शब्द सर्व शक्तिमान....!.या नंतर 
साध्या धोब्या ने घेतलेल्या शंकेने  महादेवी सीतेला अग्नी-परीक्षा द्यावी लागली.आणि संपूर्ण रामायणाचा अंत अश्रूमय झाला .
             
           सर्व मोजके शब्द भावनांची देवाण घेवाण करतात .वक्त्याचे  अंतरंग उलगडण्याचे काम करतात .
श्रावण सरी  होऊन बरसले तर एखाद्याचे जीवन फुलवून टाकतात .सांत्वनाचे मोजके शब्द दुखी जीवाला वाळवंटातील  ओएसिस प्रमाणे वाटतात .
 "निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात." निंदेचे मोजके शब्द ऐकल्या शिवाय प्रगती होणार कशी .?

              शस्त्राने केलेला घाव  वैद्याच्या औषधाने बरा  होऊ शकतो , परंतु कटू शब्दाने केलेला घाव कोणी भरून काढू शकत नाही . 
अहिंसा परमो धर्मः हि संतवाणी आहे .हिंसा शस्त्रानेच नाही तर कटू शब्दानेही होते. शाब्दिक अहिंसा म्हणजे सांत्वनपूर्वक  बोललेले तालबद्ध मधुर शब्द !
जीवन जगण्यास  खरी मजा तेव्हाच येते जेव्हा आपले मोजके शब्द झेलून घेणारे आपले कोणी तरी असते .
संत तुलसीदास जीवनातील महान रहस्य उलगडून दाखवताना म्हणतात 
                        तुलसी मिठे वचन ते , सुख उपजत चहू ओर 
                         वशीकरण ये मंत्र है,   त्यज दे वचन कठोर !



            


          






      













         















Protected by Copyscape Web Copyright Checker


Wednesday, 1 June 2011

चारोळ्या


फक्त एक तूच माझा
  बाकी  सारं नश्वर आहे,
  रोमारोमात भिनलेला ,
   तूच एक ईश्वर आहेस. 






                                       



दिखाव्याच्या जगात
 पांढऱ्या ढगांना  महत्व  असतं,
बरसणाऱ्या काळ्या कुट्ट
 मेघांना कोण विचारत नसतं.......!



या सर्व वाहनांवर ,
     माझा थोडा रोष आहे,
               भेटी नंतर विरह घडवायचा ,
       त्यांना भारी सोस आहे.
                                                 
                                                                     



मैत्री करावी अशी , 
      जशी दगडावरची भेग,
             तुझ्या मैत्रीसारखी नसावी ,
           वाळूवरची रेघ................!   
                                                                                                    




                                                                   






                                                                                 
                                           







प्रेमाच्या चक्रव्युहात,         
  आत जायला शिकावे,
 पूर्ण पणे आत गेल्यावर
   बाहेर येणे विसरावे. 
      
















                                        
                                                               


                                 

धुंद तारे मंद वारे,
  न मळलेली वाट  ,
    मंद झाले धुंद तारे ,
       झाली वाटेची वहिवाट 



                                                                                 












Protected by Copyscape Web Copyright Checker