Pages

Thursday 19 May 2011

प्रिय आईस .........


प्रिय ति. सौ . आईस ........तिर्थरुप सौ आईस,

( फारच औपचारिक वाटतं हे ) कशी सुरुवात करू...?
प्रेमस्वरूप आईस ....................वात्सल्यसिंधू आईस.........
नको फक्त आई .......आईच बरोबर आहे.
त्यातच महामंत्राचा सामर्थ्य आहे.
आईस , अनेक शिरसाष्टांग नमस्कार! तुला जाऊन किती क्षण गेले गं ! सर्व क्षणांवर
तुझ्या आठवणींचा शिक्का आहे. म्हटलं तुला पत्र लिहून कळवावं.

आई , काल मी देवळात गेले होते.तिथे देवासमोर मंद तेवणारा  नंदादीप पाहून तुझी खूपच आठवण आली.सर्वांना प्रकाश देण्यासाठी , ऊब देण्यासाठी अशीच तू पण तेवत राहिलीस.
तिथेच  श्री शंकराचा फोटो पाहिला. परत तूच आठवलीस, का माहित आहे?
...............त्या नीलकंठाने समुद्र मंथानाच्या वेळी सर्वांनी नाकारलेलं विष प्राशन केले. पण ते कंठाच्या खाली उतरवले  नाही . तुझी शिकवण आठवली मला !
"अपमानाचं विष कंठा पर्यंतच  गिळायचे , ह्रदयात  नाही पोहचवायचे ."

आज मी देवघरात पूजा करत होते ना , तेव्हा कुजबुज ऐकू आली मला ......
"हिच्या आईने तर लाजवलं मला ," ..असच चंदनाचा खोड सांगत होतं सहाणेला.

समाधान , तृप्ती , संयम, सुशीलता , लज्जा , सहिष्णुता , नम्रता ह्या गुणांची व्याख्या जर कोणी विचारली तर फक्त तुझ्या फोटो कडे बोट दाखवायचं.

आई, तुझ्या  मायेच्या जलधारांनी तू सर्वांना तृप्त केलंस.
आई , तूच मला शिकवलस आकाशात भरारी घ्यायला . घार बनून पिल्लांची राखण करायला.
देवदार वृक्ष नाही  बनता आलं तरी चालेल . हिरवळ बनून प्रसन्न रहा....हेही तूच शिकवलस ना?

तूच  मला  शिकवलस , देवाने दिलेले दोन हात , "त्याच्या" समोर जोडायला !, मदतीसाठी पुढे करायला ,भुकेलेल्यांना घास भरवायला,...............दुसरयांसमोर पसरवायला नव्हेत.
तूच  शिकवलस मला फुलासारखा वागायला ......आपल्या संगतीने मातीलाही सुगंध द्यायला.
तूच  शिकवलीस मैत्री .................. अंतरीच्या गूढ गर्भातून करायला.
तूच शिकवलीस भक्ती शबरी भिल्लीणीसारखी करायला.

पण आई.......आई एक गोष्ट तू कशी विसरलीस शिकवायला?
शिकवलं नाहीस तू मला तुझ्या शिवाय  जगायला .......तुझ्याविना जगायला.....

आई ......मी हि कुणाची आई आहे ,कुणाची पत्नी आहे, कुणाची मामी आहे , तर कुणाची बहिण ,वाहिनी, काकी आहे. पण सर्वांच्याही  आधी मी फक्त , फक्त तुझी " सोनुली" आहे , तुझ  छोटुस  बाळ आहे .....
आई .........आमच्या शाळेच्या पुस्तकात एक कविता होती,

"प्रेमस्वरूप आई, वात्सल्यासिंधू आई
बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी."

सर्व आता आठवत नाही.आठवतात  - ओळी काही.
"नाही जगात झाली , आबाळ या जीवाची ,
तुझी उणीव चित्ती आई तरीही जाची ."

हि कविता शिकवताना वर्गात एक मुलगी खूपखूप  रडायची. तिची आई तिला खूप लवकर सोडून गेली देवाघरी.
कवितेचा शेवट होता,
"घे जन्म तू फिरुनी , येईन मीही पोटी
खोटी ठरो ना देवा , ही एक आस मोठी "
आई , तुला हे मात्र ऐकावच लागेल.
   अगं  तुला सांगायच म्हणजे आमच्या बागेत ना, एका पक्षिणीने सुंदर घरट बांधून त्यात तिची गोजिरवाणी पिल्लं ठेवलीत.रोज चोचीतून दाणे आणून ती पिल्लांना भरवते.
तेथूनच काही अंतरावर सुंदर हिरवं कुरण आहे. त्यावर एक गाय आपल्या वासराला चरवत असते.
आई गं तुझ्या हातचा दही-भाताचा अमृतकाला खावासा वाटेल तेव्हा मी काय करू.....तूच सांग मी काय करू?
 आज्ञाधारकतेची तर तू परिसीमाच आहेस. परवा नाही का तू मला सोडून निघालीस..........स्वर्गाच्या गावाला,
पुष्पक विमान आलं होतं ना न्यायला तुला?......त्यांना ताटकळत कशाला ठेवायचा ,म्हणूनच जायची घाई केलीस ना?

" आई डोळे  उघड ना , उघड ना गं आई डोळे ....." असा म्हटल्यावर पाहिलस मला डोळे भरून.....मला सोडून जाऊ नको म्हटलं नाही , म्हणून तू लवकर निघून गेलीस ना ?

....................गेलीस ती गेलीस , आता एक चांगलं लक्षात ठेव . अजूनही तुझ्या पिल्लांना तुझ्या पंखांच्या सावलीची गरज आहे . घारी सारखी ठेवशील ना नजर तुझ्या पिल्लांवर?

आई, मला माहित आहे कि , देवही भोळ्या भावनांना  भुकेला आहे . त्यालाही तुझी माया हवीशी वाटली असेल. म्हणूनच त्याने तुला स्वतःकडे  नेल असेल.
या व्यवहारी जगात त्याला बोलवून हाल-अपेष्टा सहन करायला लावण्यापेक्षा तूच त्याच्याकढे गेलीस ना?

आई .................तुझ्या स्वागताला स्वर्गात रत्नजडीत रथ उभा असेल, मऊसुत रेशमी गादी घातलेली चंदनाची पालखी असेल. दिव्यफुलांच्या पायघड्या पसरवल्या असतील देवदूतांनी ,सुगंधी अत्तरांचे फवारे उडत असतील , हिरेमाणीकांची तोरणे बांधली असतील . सनई चौघडे वाजत असतील.ताऱ्यांची रोषणाई असेल, पंचारतीने ओवाळायला उभ्या असतील द्रौपदी, कुंती , सावित्री, मीरा , अनुसया !
पंच पक्वान्नांच्या पंगतीला आपल्या बरोबर बसवतील तुला त्या !
त्यावेळीही तुला तुझी लेकरच आठवतील......ठेवशील घास काढून बाजूला आमच्या साठी .....

  तू एका अजातशत्रूची , चैतन्याच्या कल्पतरूची , सद्गुणाच्या महामेरुची सुवासिनी आहेस.
त्यांच्या सारख्या प्रेमळ पित्याची देणगी तू आम्हाला दिलीस . तू तर एक तपस्विनी आहेस.
"कर्मण्ये वा धिकारास्ते मां फलेषु कदाचन " हाच तुझा धर्म होता. पतिसेवा हे तर तुझे आवडते कर्म.

 दुसऱ्यांच्या दुखाने  रडणारी, ऐरवी छोट्या छोट्या गोष्टीनाही खदखदून हसणारी, निरागस सुहासिनी आहेस.
अहिल्या नाव तुझ कोणी ठेवलं, तू तर साक्षात अन्नपूर्णा होतीस.
चल आता पत्र खूपच लांबत चाललं . कोणी वाचलं तर वेडी म्हणतील  मला . पण वेडेपण ही तूच शिकवलस मला.
चतुराई तुला कधी जमलीच नाही.

आई ...तुझ्या लेकरांच्या सर्व अश्रूंची फुले झालीत. जिथे जिथे तू पाऊल टाकशील , तिथे तिथे त्या फुलांचा सडा पडलेला असेल.
आता मात्र पत्र  पुरेच करते. कारण कितीही लिहिलं तरी पूर्ण  होणार नाहीत मायलेकींच्या गप्पा !

पत्राचं उत्तर जरूर जरूर दे. कशी देशील सांग ?  ....त्या दयाघनाला , परमेश्वराला मी आळवीन.
प्रार्थना करेन की, हे जगदीश्वरा माझी माउली माहेरवाशीण म्हणून आली आहे तुझ्याकडे . तिला कधीमधी  आमच्या स्वप्नांच्या  गावी पाठवशील ना ? नाही ...पाठवच .

आई ..........लांब कुठेतरी  सूर ऐकू येतायत गाण्याचे...

" येशील तू घराला परतून केधवा गे,
रुसणार मी आता जरी बोलशील रागे ,
आई कुणा म्हणू मी , आई घरी दारी,
स्वामी तिन्ही जगाचा , आईविना भिकारी.........
.......आईविना भिकारी!"

तुझ्या ..परत....येण्याची...आतुरतेने वाट ...पाहणारी ...

तुझी आशा.........

Protected by Copyscape Web Copyright Checker