Pages

Monday, 15 August 2011

येथे कर माझे जुळती !

      कणाकणात  भरलेला परमेश्वर  अनेक रूपांनी  आपल्याला  दर्शन  देत  असतो  .मनुष्य  ही त्याची    सर्वश्रेष्ठ  कलाकृती   आहे  .या कलाकृतीतून  तो  कधी  कधी  आपले  रूप  प्रकट  करतो .
  
     कै. तीर्थरूप मेजर नारायणराव .भ.खानविलकर (माझे सासरे ) यांच्या बाबतीत  हे  पुरेपूर पटते .दि .१९ जानेवारी   २००७  रोजी  वयाच्या  ८६  व्या  वर्षी  त्यांनी स्वर्गलोकाचे   आमंत्रण आले  .
     
       द्वेषभावनेपासून  रहित , प्राणीमात्रांशी  जो  मित्रतेचा  भाव  राखतो , दया आणि करुणेने ज्याचे हृदय ओतप्रोत भरलेले आहे, ज्याच्या अंगी  मी आणि माझे  हा  अहंकार  नाही, पक्ष -विपक्ष  न  मानणारा , क्षमाशील  जो  सतत  संतुष्ट  आहे ,ज्याची  भक्ती  आणि संकल्प  दृढ  आहे  , ज्याने  आपले  मन  व  बुद्धी  ईश्वराच्या  चरणी  अर्पित  केली आहे  असा  भक्त  मला  अतिशय  प्रिय  आहे .  भगवान  श्री  कृष्णाने  गीतेमध्ये  केलेले  हे  कथन , ति.  पप्पांच्या  (कै .मेजर  नारायणराव  खानविलकर ) जीवनाशी  तंतोतंत  जुळते .परमेश्वरावर असलेली अतूट श्रद्धा आणि गाठीशी असलेली अमाप पुण्याई त्यांना अनेक युद्धातून सुखरूप परत घेऊन आली.
                               
       १९५६ सालापासून तिबेट , नेफा  आणि नागालंड या सरहद्दीवरच्या  उमेदीची अनेक वर्ष त्यांनी देशसेवेसाठी अर्पण केली .१९५९ साली त्यावेळच्या नेफाच्या गव्हर्नरकढून  त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसापत्र मिळाले.
१९६२ सालातील भारत-चीन युद्धात त्यांचा सक्रीय सहभाग होता.१९६५ साली भारत-पाक युद्धात त्यांचा ६-कुमाओ रेजिमेंटने  इछोगील कॅनल क्रोस केला आणि यशस्वीरीत्या  लाहोर कढे कूच  केला.
१९७१  साली बांगला युद्धातही  ते  सहभागी  होते  .हिमालयाची उत्तुंग शिखरे त्यांच्या या सर्व पराक्रमांची साक्ष देतात .    
     उन-पाऊस , कडे कापऱ्या , भूक -तहान , काटेकुटे कशा कशाचीही पर्वा त्यांनी केली नाही.देशसेवा हेच एक व्रत .....मनात एकाच घोष..
                 अपनी आजादी को हम हरगीज मिटा सकते  नही,
                 सर  कटा सकते  है लेकीन  सर  झुका  सकते  नही.

        अत्यंत  रुबाबदार  असे  व्यक्तिमत्व  त्यांना लाभले  होते .उमदा  स्वभाव  , कमालीची  विनम्रता , तसीच  वाखाणण्यासारखी   परोपकारी वृत्ती  असल्यामुळे  'हे  विश्वची माझे  घर  '  हीच  त्यांची  स्वतःच्या  घराची  संकल्पना  होती.
 गरजू विद्यार्थ्यांना योग्य  शिक्षण मिळावे म्हणून ते सतत प्रयत्नशील असत .याचे उत्तम उदाहरण म्हणजे
स्वतःच्या मुलाला (श्री विभाकर) मिळालेली राष्ट्रीय शिष्यवृत्ती त्यांनी घेऊ नको म्हणून सांगितले . त्या मागची उद्दात भावना अशी कि , ते म्हणत" तुझी शैक्षणिक फी भरण्यास मी समर्थ आहे , ह्या शिष्यवृत्तीची 
खरी गरज एखाद्या गरीब होतकरू  विद्यार्थ्याला असेल तर त्याला ती मिळू दे ".
               आपल्या पुरुषार्थावरचा  असा ठाम विश्वास , तसेच निःस्वार्थ वृत्ती क्वचितच पहावयास मिळते .
सीमेवर असतानाही आपल्या कुटुंबियांच्या भवितव्याकडे   त्यांनी कधीच दुर्लक्ष केला नाही .हृदयात खोलवर 
रुजलेली राष्ट्रनिष्ठा व शिक्षणावरील आत्यंतिक प्रेम त्यांच्या अनेक पत्रातून दिसून येते.
              "जय जवान जय किसान " हा जयघोष त्यांनी मनोमन जपला .निवृत्तीनंतर शहरात मिळू शकणाऱ्या
अनेक सुख-सोयींना झुगारून देऊन त्यांनी आपल्या लाडक्या बेनी गावी राहण्याचा निश्चय केला. गावी जाऊन 
त्यांनी स्वतः शेती बागायतीवर मेहनत घेतली. युद्धात शत्रूला खडे चारणारे "जय जवान" आता  "जय किसान" झाले .रायफल ठेवल्यावर , नांगर उचलून त्यांनी आपला खांदा सजवला .
             " हाताने काम , मुखाने नाम व अन्तः करणात राम " हे त्यांचे जीवनमूल्य होते. रत्नागिरीच्या सोल्जर बोर्डात सेक्रेटरी म्हणून कार्यरत असतांना त्यांनी अनेक सैनिक कुटुंबाना त्यांची हक्काची पेन्शन मिळवून दिली. या कामासाठी ते खूप कष्ट घेत असत. तहानभूक विसरून , खेड्यापाड्यात पायी चालून ते हे काम करीत असत . ह्या मोबदल्यात आपल्याला मान-सम्मान मिळावा अशी त्यांनी कधीच अपेक्षा केली नाही. किंबुहाना हा मिळू शकणारा सम्मान त्यांनी फाइल मध्ये बंधिस्त करून टाकला .
                 देशसेवा हेच त्यांचा व्रत व ध्येय असल्यामुळे अतिरिक्त , अर्थार्जनाची हाव त्यांनी केली नाही. त्यांच्या "मेजर"  या पदवीत ते खुशाल होते .
            देशसेवेच्या व्रतातून त्यांनी शारीरिक निवृत्ती घेतली पण मनाने ते अखेर पर्यंत "वीर जवान" च होते .
            पहाटे चार वाजता उठून ते समर्थांच्या दासबोधाचे पारायण करत असत . त्यानंतर १-२ तास देव पूजा ,
प्रार्थना होत असे. नंतर मोठ्या अभिमानाने ते उभे राहून " जन-गण-मन" हे राष्ट्रगीत म्हणत असत. शेवटी 
"भारतमाता कि जय " या जयघोषाने पूजा समाप्त होत असे. २६ जानेवारी  व १५ ऑगस्ट या दोन्ही दिवशी 
झेंडावंदनासाठी ते आवर्जून नजीकच्या ऑफिस मध्ये हजर असत . जो पर्यंत तब्बेत साथ देत होती .....हे दोन्ही 
राष्ट्रसण त्यांनी आनंदाने साजरे केले . या दिवशी दूरदर्शनवर असणारे राष्ट्रपतींचे भाषणही मन लावुन,अभिमानाने ऐकत असत . हे जीवन क्षणभंगुर आहे , इथे जगायला मिळणारा प्रत्येक क्षण किती मोलाचा आहे , तो कसा सत्कारणी लावावा हे त्यांच्या जीवन पटावरून शिकावे.
        त्यांचा करारी स्वभाव व कडक शिस्त  या बद्दलची अनेक मते ऐकू येतात कधी कधी ! परंतु मला वाटतं की, "टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही " यावर त्यांचा विश्वास होता .
     आपल्या जीवनातील सुख-दुःखाचे प्रसंग व त्यापासून मिळालेली शिकवण , आम्हाला ते समजावून सांगत असत.अशारितीने त्यांनी आमच्या मनाच्या मातीला अनुभवाच्या चाकावर फिरवून सुंदर घड्याचे रूप दिले .
त्या घड्यात सुविचाररुपी हिरे , माणिक , मोती भरून ठेवायची जबाबदारी आमची आहे . याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. 
    त्यांचं खंबीर अस्तित्व आमच्यासाठी एक अभेद्य तटबंदी होती . त्यांच्या पवित्र हृदयमान्दिरातून निघालेल्या शब्दांचा घंटानाद आम्हा सर्व लेकरांच्या मनात अखंड घुमत राहील एवढी ताकद त्या शब्दांत आहे.
   अथक परिश्रम अतिसंवेदनक्षम मन आणि वृद्धत्वाकडे  झुकलेलं शरीर यामुळे हळूहळू यांचा स्मृतिभ्रंश  होऊ 
लागला .अल्झेमर हा पूर्ण बरा न होणारा आजार त्यांना जडला .गतस्मृतीत कधी कधी ते दंग होत व म्हणत ,
"मला फ्रंटवर बोलावलं आहे मला लगेचच निघावं लागेल , सामान वगैरे बांधून तयार आहे , गाडीचीच  वाट
बघतोय ...."
नसनसात भिनलेली पारदर्शी राष्ट्र भक्तीच असा बोलू शकते .
   जीवनाच्या अखेरीस " ओम नमः शिवाय " हा मंत्र ते सतत जपत राहिले . आशीर्वाद देणारे दोन्ही हात फक्त 
महादेवासाठी जोडले गेले .
    अखेरचा काही काळ फक्त प्रशांत......निःशब्द ......अवस्था होती. उरलं होतं फक्त अंतिम समर्पण .
परम कर्तव्यासाठी , देव आणि देशभक्तीसाठी  , या परमवीराने १९ जानेवारी २००७ रोजी आपली इहलोकीची यात्रा संपवली , अखेरचा संदेश देत ......

                                  सांस थमती गयी, नब्ज जमती गयी 
                                           फिर भी बढते कदम को न रुकने दिया 
                                   कट गये सर हमारे , तो कुछ  गम नही
                                        सर हिमालय का हमने न झुकने दिया 
                                  मरते मरते रहा बाकपन साथीयो
                                        अब तुम्हारे हवाले वतन साथीयो ..........
                                  कर चले हम फिदा जानो तन साथीयो 
                                       अब तुम्हारे हवाले वतन साथीयो....!

भारतमातेच्या वीरजवानांना माझे शतशः  प्रणाम !
                                            

                                                 जय हिंद !

  


Protected by Copyscape Web Copyright Checker

No comments:

Post a Comment

leave a comment